dr.satish drag and drop website developer

आमचं गाव :


आमच्या गावात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. पण त्यांच्यामध्ये एकी आहे. सर्व लोक मिळून-मिसळून राहतात. आमच्या गावात महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. “गांधी जनशताब्दी” प्रसंगी गावात हरिजन उद्धार व अस्पृश्यता उच्चाटन करण्याचे व्रत गावाने स्वीकारले. व सन 1969-70 सालचे महाराष्ट्र शासनाच्या हरिजन उद्धार व अस्पृश्यता निवारण मोहिमेतील जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाला मिळाले. आजपर्यंत गावाला असे अनेक पारितोषिक मिळाले आहेत. तसेच आमच्या गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्ह्यातील पहिले पारितोषिक मिळाले. आमचं गाव आकाराने मोठे असल्यामुळे गावात उत्तम शिक्षणाची, आरोग्यविषयक, वित्तीय सुविधा उपलब्ध आहेत. आमच्या गावात दर मंगळवारी बाजार भरतो. त्यामुळे गावातील लोकांना बाहेरगावी बाजार करण्यासाठी जावे लागत नाही.

कृषी आणि गाव :

स्वच्छ व सुंदर असलेलं व आकाराने मोठं असलेलं असं आमचं गाव. गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे गावात सर्व सोई उपलब्ध आहेत. आमच्या गावामध्ये बोअर, विहीर, शेततळी, ओढे, बंधारे इत्यादी पाण्याच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे गावाला पाण्याची कमतरता नाही. याच पाण्याच्या आधारावर गावातील लोक शेती करतात. गावात नळपाणी योजनेअंतर्गत पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. शिवाय गावात एक विद्युत पंप व एक हातपंप आहे. त्यामुळे गावातील पाण्याची सोय अतिशय उत्तम आहे. गावातील गावठाण क्षेत्र हे 4.62 हेक्टर, बागायती कृषी क्षेत्र 70.05 हेक्टर, जिरायती कृषी क्षेत्र 244 हेक्टर आहे. गावातील प्रमुख पिके ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा ही पिके आहेत. तसेच आंबा, काजू, केळी, चिकू, नारळ इत्यादी फळबागादेखील आहेत. तसेच गावातील काही लोक आपल्या शेतात भाजीपाल्याचे देखील उत्पन्न घेतात. त्यामुळे गावातील लोकांची परिस्थिती सुधारली आहे. तसेच गावातील तरुण व होतकरू नागरिकांनी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री, फळप्रक्रिया, दालमिल व इतरही काही व्यवसाय चालू केले आहेत. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. आमच्या गावात आधुनिक पद्धतीने, सर्व शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते. शेती करण्याचे स्वरूप बदलल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

गावातील मंदिरे :

आमच्या गावात श्री भावेश्वरी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री ब्रम्हदेव मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री मरगाईदेवी मंदिर, समाज मंदिर  इत्यादी मंदिरे व चर्च आहे. आमच्या गावाचे ग्रामदैवत हे श्री भावेश्वरी देवीचे आहे. गावातील लोक सर्वधर्म समभाव या गांधीजींच्या विचाराने प्रवृत्त झालेले आहेत. त्यामुळे गावात एकी आहे. गावातील सर्व लोक एकत्र येवून सर्व सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतात. गावातील श्री महालक्ष्मी व श्री भावेश्वरी देवीची यात्रा केली जाते. यात्रेच्या वेळी गावातील सर्व लोक एकत्र येतात. गावातील जी लोकं कामासाठी मुंबई किंवा बाहेरगावी गेलेले असतील तर तेदेखील यात्रेच्या वेळी गावी येतात, व गावाच्या व मंदिराच्या उद्धारासाठी देणगी स्वरुपात काही पैशांची मदत करतात.

ADDRESS
HEBBAL JALDYAL Grampanchayat
A/p HEBBAL JALDYAL Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone :7588940733

Office : 02327 – 239165